मेहमूद यांच्याशी लग्न झाल्याची अफवा, ‘या’ अभिनेत्रीचं बर्बाद झालं करिअर, पण… वाचा

टीम AM : बॉलिवूडचे लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेते मेहमूद यांची 29 सप्टेंबर 2023 रोजी 91 वी जयंती आहे. चार दशकांच्या कारकिर्दीत मेहमूद यांनी अनेक चित्रपट दिले, ज्यातील त्यांच्या हटके विनोदी शैलीचे आजही कौतुक होते. ते केवळ विनोदी कलाकारच नव्हते तर उत्तम अभिनेते, गायक आणि दिग्दर्शकही होते. अनेकांना मदत करणारे अभिनेते म्हणून त्यांनी मोठी ओळख कमावली होती. महानायक अमिताभ बच्चन यांनाही त्यांनी मदत केल्याचे किस्से आहेत. मात्र, एका लोकप्रिय अभिनेत्रीचे करिअर मेहमूद यांच्याशी नाव जोडले गेल्याने संपता संपता राहिलं होतं.

ही अभिनेत्री म्हणजे अरुणा इराणी. अरुणा यांनी कधी ‘आई’ ची भूमिका साकारुन ‘राजा बाबू’ प्रमाणे मुलाचे लाड केले आहेत, तर कधी नकारात्मक भूमिका साकारली. त्यांनी केवळ हिंदीच नव्हे तर कन्नड, मराठी आणि गुजराती भाषेतील 500 हून अधिक सिनेमात काम केले. 70 – 80 च्या दशकातील त्या लोकप्रिय अभिनेत्री होत्या. मात्र, त्यांच्या करिअरमध्ये एक वेळ अशी आलेली जेव्हा त्यांचे नाव मेहमूद यांच्यासोबतच्या अफेअरमुळे गाजले. त्यांचे लग्न झाल्याचीही अफवा उडाली होती.

मेहमूद आणि अरुणा या जोडीवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले, त्या दोघांमधील केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की, दोघांनी लग्न केल्याच्या अफवा उडाल्या होत्या. याचा परिणाम असा झाला की, अरुणा यांना जवळपास दोन – अडीच वर्षे चित्रपटात काम मिळणे बंद झाले. अभिनेत्रीने दिलेल्या एक मुलाखतीत याविषयी भाष्य केले होते. त्यांनी असे म्हटले की, त्यावेळी मराठीतील सुपरस्टार दादा कोंडके त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी अरुणा यांना मराठीमध्ये काम दिले. यानंतर अरुणा यांनी टीव्हीवरही खूप काम केले होते.

अरुणा आणि मेहमूद यांनी ‘औलाद’, ‘हमजोली’, ‘देवी’ आणि ‘नया जमाना’ हे सिनेमे एकत्र केले आहेत. त्यांचा ‘बॉम्बे टू गोवा’ विशेष गाजला. त्यांच्या लग्नाबद्दल उडालेल्या अफवेबद्दल अरुणा म्हणाल्या की, ‘मला माहित नाही की मेहमूद साहेब आणि माझ्या लग्नाची अफवा कुठून आणि कशी पसरली. पण यामुळे एकही निर्माता माझ्यासोबत काम करायला तयार नव्हता. मग दादा कोंडके यांनी मला ‘आंधळा मारतोय डोळा’ या मराठी चित्रपटात गाण्याची ऑफर दिली. त्याच्यामुळेच मला पडद्यावर परतणे शक्य झाले.’