टीम AM : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात मध्यम ते मुसळधार सरींनी हजेरी लावली. दरम्यान, आज विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला.
शुक्रवार व शनिवारी राज्यभर मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरण पाणलोटात पावसाची मोठी आवक झाली.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.