हृदयद्रावक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू, मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश

टीम AM : राज्यात एकीकडे गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बिलोली तालुक्‍यातील बामणी या गावाजवळील एका पाझर तलावात तीन शाळकरी मुलांचा तर नांदेड मधील गोदावरी नदीपात्रात एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

देवानंद पिराजी गायकवाड (15), बालाजी पिराजी गायकवाड (12) व वैभव पंढरी दुधारे (15, सर्व रा. बामणी) असे मृतांची नावे आहेत. यात दोन सख्या भावांचा समावेश आहे. तसेच नांदेडमधील बुडालेल्या तरूणाचे नाव अद्याप समजू शकले नाही. 

बिलोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे बामणी येथे पाझर तलावात गुरूवारी (दि. 28) सकाळी अंदाजे साडेआठ वाजता ते नऊ वाजेच्या सुमारास, देवानंद गायकवाड, बालाजी गायकवाड, वैभव दुधारे व अन्य एक जण आंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यापैकी तिघेजण तलावात आंघोळ करण्यासाठी गेले असता तिघांचा पाण्यात बुडून मृत्य झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.