धक्कादायक : लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, 100 जणांचा होरपळून मृत्यू, ‘या’ ठिकाणी घडली घटना.. वाचा

टीम AM : उत्तर इराकमधील निनेवेह प्रांतात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील अल-हमदानिया जिल्ह्यातील एका गावात लग्नाच्या हॉलमध्ये आग लागल्यामुळे तब्बल 100 जणांचा बळी गेला आहे. तर 150 हून अधिक लोक जखमी आहेत. जखमींपैकी काही जणांची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निनेवेह प्रांत हा इराकची राजधानी बगदादच्या वायव्येस 335 किलोमीटर दूर आहे. तर मोसुलपासून जवळ आहे. इराकी वृत्तसंस्था नीनाने दिलेल्या वृत्तानुसार या आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांमध्ये वधू आणि वराचाही समावेश आहे.

दरम्यान, या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रथमदर्शनी ही आग फटाक्यांमुळे लागली असावी असं सांगितलं जात आहे. नीना या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या फोटोत एक फायरफायटर आग विझवण्याचं काम करत आहे. तसेच स्थानिक पत्रकारांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये जळून खाक झालेला लग्नाचा हॉल दिसत आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, आग लागली तेव्हा हॉलमध्ये लग्नाचा मुख्य कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे हॉलमध्ये शेकडो वऱ्हाडी उपस्थित होते. आग लागल्यानंतर बहुतांश पाहुणे बाहेर पळू लागले. परंतु, आग इतक्या वेगाने पसरली की जवळपास 200 ते 250 लोक आतच अडकले होते. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचारी, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी आणि लोकांना वाचवण्यासाठी सर्वांनीच शर्थीचे प्रयत्न केले.