शेतकरी बचाव कृती समितीचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश’ मोर्चा

राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

टीम AM : शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळी ‘आक्रोश’ मोर्चा आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते. मोर्चात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चातील घोषणांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. 

ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळी परिस्थीती निर्माण झालेली आहे.  तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न, खरीप पिकाचा प्रश्न, पिकविम्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानापोटी प्रति हेक्टरी 1 लाख रुपये खात्यावर तात्काळ द्यावेत, यासह अन्य मागण्यांसाठी 40 गावच्या सरपंचांनी शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात सरपंचांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘या’ आहेत प्रमुख मागण्या….

◼️अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानापोटी प्रति हेक्टरी 1 लाख रुपये खात्यावर तात्काळ द्यावेत.

◼️खरीप 2023 – 24 या वर्षीचा पिकविमा शंभर टक्के मंजूर करा व शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीमसह शंभर टक्के विमा तात्काळ जमा करावा.  

◼️शेतकऱ्यांचे सरसकट पिककर्ज माफ करावे व गेल्या वर्षाचे अतीवृष्टीचे राहिलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे. 

◼️मागील वर्षीचे राहिलेले शेतकऱ्यांचे महात्मा ज्योतीबा फुले प्रोत्साहनपर योजनेतील 50 हजार रुपये खात्यावर तात्काळ जमा करावे. 

◼️पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या तात्काळ चालू कराव्यात

◼️शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फिस माफ करावी.

◼️सन 2020 – 21 चा मंजूर पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा. 

◼️शेतीसाठी पूर्ण क्षमतेने किमान 8 तास अखंडित विज पुरवठा करावा.

◼️दुष्काळी परिस्थितीमुळे महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे.

◼️लम्पी रोगामुळे जनावराचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याला प्रति 1 लाख रुपये तात्काळ द्यावेत.

या मागण्या उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.