खळबळजनक : अंबाजोगाईच्या तरुणाचे मंत्रालयात आंदोलन, सुरक्षा जाळीवर मारली उडी 

टीम AM : शिक्षक भरती करण्यात यावी, या मागणीसाठी अंबाजोगाईच्या तरुणाने मुंबईतल्या मंत्रालयामध्ये आंदोलन केले. या तरुणाने थेट मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारली. यावेळी तरुणाने जोरदार घोषणाबाजी देखील केली. पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उडी मारून या तरूणाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली. रणजित आव्हाड असे या तरुणाचे नाव असल्याचे समजते. 

मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक भरती करावी, या मागणीसाठी अंबाजोगाईतील तरुणाने मंत्रालयात आज आंदोलन केले. लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी, अशी मागणी या तरुणाने केली आहे. हा तरुण उसतोड कामगार आणि प्रकल्पग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.

या तरुणाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर मंत्रालयामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मंत्रालयातील पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरक्षा जाळीवर उडी मारत या तरुणाला बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.