तगडा जनसंपर्क असणारे विनोद पोखरकर लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश ? : राजकीय समीकरणे बदलणार

टीम AM : सामाजिक, राजकीय, उद्योग क्षेत्रात सक्रिय असणारे तसेच अंबाजोगाई शहरासह तालुक्यात तगडा जनसंपर्क असणारे विनोद पोखरकर लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली असून त्यांच्या प्रवेशाने शहरासह तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दरम्यान, प्रवेशाची तारीखही निश्चित झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

अंबाजोगाई शहरासह तालुक्यात विनोद पोखरकर यांचे वेगळे अस्तित्व आहे. राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामाच्या आधारावरचं त्यांना ‘बसव’ ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष आणि युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अशी महत्वाची पदे देण्यात आली होती. या पदावर असताना त्यांनी आपल्या कार्याची चुणूक सर्वांना दाखवून दिली आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच असलेले संघटन कौशल्य आणि तरुणांच्या हितासाठी, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विनोद पोखरकर झोकून काम करत असतात. स्वबळावर विनोद पोखरकर यांनी उद्योग क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली असून अंबाजोगाई शहरात आज त्यांच्या ‘सुरभी’ हॉटेलच्या चार शाखा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. या शाखेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे. 

कोरोना सारख्या महाभयंकर काळात देखील विनोद पोखरकर यांनी स्मशानभूमीत स्वखर्चाने एक वर्ष पिण्याचे पाणी तहानलेल्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले. त्यासोबतचं या काळात 25 हजार लोकांना मोफत जेवणाचीही व्यवस्था त्यांनी केली. त्यांच्या या कार्याचे कौतुक सर्व स्तरांतून करण्यात आले होते. तसेच ‘बसव’ ब्रिगेडच्या माध्यमातून समाजबांधवांचे प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असतात. त्यांच्या या कार्यामुळेचं अंबाजोगाई शहरातील आणि तालुक्यातील तरुणांची फौज त्यांच्या पाठीशी उभी आहे. आपल्यासोबत असणाऱ्या समाजाचे आणि तरुणांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी भाजपची वाट धरली असल्याचे समजते. युवा नेते विनोद पोखरकर यांच्या प्रवेशाबाबत भाजपाच्या दिग्गज नेत्यांशी बोलणी झाली असून लवकरच ते आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत हे मात्र निश्चित आहे.