अभिनेत्री तनुजा यांचा वाढदिवस : आईच्या एका थप्पडने बदलली करिअरची दिशा, ‘हा’ किस्सा ऐकलायत का ?

टीम AM : 70 च्या दशकांत आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तनुजा यांचे नाव आवर्जून घेतले जाते. आज ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांचा 80 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर रोजी मुंबईत झाला. तनुजा या फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील असल्यामुळे अभिनयाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. प्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ या तनुजा यांच्या आई होत्या. तर, त्यांचे वडील देखील प्रसिद्ध निर्माते होते. इतकेच नाही तर, तनुजा यांची मोठी बहीण अर्थात नूतन या देखील सुपरस्टार होत्या. त्यामुळे त्यांचं मनोरंजन विश्वात येणं हे तसं स्वाभाविकच होतं.

तनुजा मनोरंजन विश्वात पदार्पण करणार हे ठरलेलंच होतं. पण, त्यातही एक अट अशी होती की, त्या बहीण नूतन पदार्पण करेपर्यंत चित्रपटाच्या सेटवर जाऊ शकत नव्हत्या. तनुजा यांनी नूतन यांच्या ‘हमारी बेटी’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. अर्थात ही भूमिका होती लहान वयातील नूतन यांचीच… कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे तनुजा यांना वयाच्या 16 व्या वर्षी पदार्पण करावे लागले. वयाच्या 16 व्या वर्षी 1968 मध्ये त्यांचा पहिला चित्रपट ‘छबिली’ रिलीज झाला होता. यानंतर 1962 मध्ये त्या ‘मेमदीदी’ या चित्रपटात झळकल्या. तनुजा यांनी अनेक बंगाली चित्रपटही केले आहेत. तनुजा यांच्या मते, बंगाली चित्रपटांनी त्यांना आयुष्यात अधिक समाधान दिले आहे.

तनुजा यांना सुरुवातीला वाटले होते की, आई आणि बहीण प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने त्यांच्या कारकिर्दीत काही अडचण येणार नाही. त्यांना त्यांची आई शोभना समर्थ यांनी ‘छबिली’ या चित्रपटातून लॉन्च केले होते. मात्र, आईचाच चित्रपट असल्याने तनुजा या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान खूपच नखरे दाखवत होत्या. या चित्रपटात एक असा सीन होता, ज्यामध्ये तनुजा यांना रडायचं होतं. पण, त्या दरम्यान तनुजा यांना इतके हसू येत होते की, त्या रडूच शकल्या नाहीत.

तनुजा यांनी दिग्दर्शक केदार शर्मा यांना थेट जाऊन म्हटले की, मी आज रडण्याच्या मूडमध्ये नाहीये. तनुजा यांच्या बोलण्यामुळे दिग्दर्शक केदार शर्मा इतके संतापले की, त्यांनी तनुजाच्या श्रीमुखात भडकावली. तनुजा लगेच आपल्या आईकडे रडत रडत गेल्या आणि त्यांनी केदार शर्माबद्दल तक्रार केली. मात्र, हा संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर त्यांच्या आईनेही उलट तनुजा यांनाच चापट मारली. यानंतर तनुजा यांना रडू कोसळलं, तेव्हा शोभना समर्थ त्यांना सेटवर घेऊन गेल्या आणि तो रडण्याचा सीन पूर्ण करायला लावला. या चित्रपटानंतर त्यांना पुन्हा मागे वळून पहावे लागले नाही.