अंबाजोगाईत मुसळधार पाऊस : वाण नदीच्या पुलावरून वाहू लागले पाणी, जनजीवन विस्कळीत

‘स्वाराती’ रुग्णालय रस्त्यावरील कोसळले झाड

टीम AM : अंबाजोगाई शहरात आज दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस इतका जोराचा होता की, शहरातील अनेक भागातील घरात पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला. दरम्यान, आज झालेल्या मुसळधार पावसाने वाण नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले, यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. 

दुसरीकडे ‘स्वाराती’ रुग्णालय रस्त्यावरील मोठे झाड पावसाने कोसळले. त्यामुळे त्याही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. नगरपरिषद प्रशासनाची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि झाड बाजूला केले, आता वाहतूक सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

वातावरणातील अनुकूल बदलांमुळे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस पडणार आहे, असा इशारा राज्याच्या हवामान विभागाने दिला होता. तो इशारा खरा ठरला असून बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. 

दरम्यान, अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठ भागातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे. त्या ठिकाणी वास्तव्यास  असणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यासोबतच पोखरी रोड परिसरातील घरामध्येही पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अंबाजोगाई शहरातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. काही वेळाने विद्युत पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.