टीम AM : वातावरणातील अनुकूल बदलांमुळे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस पडणार आहे.
झारखंडमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झालीय. ते सध्या चक्रीय स्थितीमध्ये आहे. तर सिक्कीम ते दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच विदर्भ मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा रेषा सक्रीय झालाय. त्यामुळे पुढील 48 तासांत राज्याच्या चौफेर भागात कमी – अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय.
परतीचा पाऊस
25 सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थानातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात आज आणि उद्या चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील काही ठिकाणी 5 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज आहे. सध्या देशातील काही राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. मात्र, काही भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे.