‘बेबो’ चा वाढदिवस : सैफच्या आधी करीनाच्या आयुष्यात होता ‘हा’ खान

टीम AM : बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘बेबो’ म्हणून करीना कपूर – खान ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली आहे. आज 21 स्प्टेंबर रोजी करीना कपूर खानचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी…

करीनाने 2012 मध्ये तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. सैफ आणि करिनाची जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट जोड्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या दोघांची प्रेमकथाही तितकीच रंजक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, करिनाने सैफला पसंत करण्यापूर्वी बॉलिवूडमधील दुसऱ्याच एका खानची निवड केल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने साऱ्यांना घायाळ करणारी करीना कधीकाळी अभिनेता फरदीन खानच्या प्रेमात होती. 2003 साली प्रदर्शित झालेल्या ‘खुशी’ या चित्रपटादरम्यान करीना आणि फरदीनचे सूत जुळले होते. सेटवर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र, काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. आजही दोघे चांगले मित्र – मैत्रिणी असल्याचे पाहायला मिळते.

आज पतौडी कुटुंबाची सून असलेल्या करीनाचे नाव अभिनेता हृतिक रोशन आणि शाहिद कपूरसोबतही जोडले गेले होते. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी करीना – हृतिकची जवळीकता वाढली होती. मात्र, या गोष्टीची चुणूक हृतिकची पत्नी सुझैनला लागल्यामुळे करीना – हृतिकच्या नात्यात दुरावा आला. विशेष म्हणजे त्यानंतर ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ या चित्रपटात ही जोडी शेवटी झळकली. त्यानंतर अद्यापही या जोडीने एकत्र स्क्रिन शेअर केलेली नाही.

करीना आणि शाहिदच्या अफेअरच्या चर्चा तर तुफान होत्या. दोघांनी 3 वर्षे एकमेकांना डेट केले. मात्र, सैफ अली खानच्या येण्यामुळे या जोडीमध्ये दुरावा निर्माण झाला आणि ही जोडी अखेर विभक्त झाली. ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ – करिना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ‘कुरबान’ चित्रपटातही या दोघांनी स्क्रिन शेअर केली. या चित्रपटामध्ये या दोघांची रोमॅण्टीक केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यानंतर तात्काळ या जोडीने लग्नाचा निर्णय घेतला आणि ही जोडी विवाहबंधनात अडकली.