अंबाजोगाई जिल्हा निर्मिती, ‘एमआयडीसी’, टेक्स्टाईल पार्क, बुटेनाथ तलावासह अनेक मुद्यांकडे दुर्लक्ष
टीम AM : मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या अंबाजोगाई शहराची अधोगतीकडे वाटचाल सुरु आहे. गेल्या कित्येक वर्षांच्या कालखंडात अंबाजोगाईचे विकासाचे प्रश्न ‘जैसे थे’ चं असून ते सोडविण्यात विद्यमान आमदारांना अपयश आले आहे. केवळ निवेदनावरचं विद्यमान आमदारांनी पाच वर्षे काढली असून त्यांनी अंबाजोगाईच्या विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले आहे. याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदारांना बसणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
मराठवाड्यातील एक सुसंस्कृत शहर म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे. या शहरातील जनता भावनिक, आध्यात्मिक आणि संवेदनशील आहे. अंबाजोगाईकरांच्या याच गुणांचा फायदा घेत राजकारण्यांनी या शहराला विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अंबाजोगाईच्या नंतर उदयास आलेल्या शहरांचा झपाट्याने विकास झाला आहे. काही शहरांना तर न मागता विकासाचे प्रकल्प मिळाले आहेत. परंतू, अंबाजोगाईकरांना मात्र केवळ आश्वासनावरचं समाधान मानावे लागत आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मिती, ‘एमआयडीसी’ टेक्सटाईल पार्क, बुटेनाथ तलाव यासह अन्य विकासाचे मुद्दे केवळ कागदावरचं राहिले आहेत.
बीड जिल्ह्यात दोन ‘एमआयडीसी’ ला मंजुरी
बीड जिल्ह्यात दोन ‘एमआयडीसी’ ला मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील आष्टी आणि परळी तालुक्यात या ‘एमआयडीसी’ होणार आहेत. परंतू, अंबाजोगाईकरांची ‘एमआयडीसी’ ची मागणी जुनी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अंबाजोगाईच्या जनतेची घोर निराशा झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींना जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे.