धक्कादायक : गणपतींचे विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू

टीम AM : दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील नाल्यात दोघांचा तर गोऱ्हे येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जगत नारायण मौर्य (वय 38), सुरज नंदलाल प्रजापती (25) अशी कोनसई येथील नाल्यात तर प्रकाश नारायण ठाकरे (वय 35) गोऱ्हे येथील तलावात बुडून मृत्यूमुखी पडला आहे. 

गणेश विसर्जन दरम्यान गणेश भक्तांचा उत्साह हा शिगेला पोहचतो. राज्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात असतो. त्यामुळे शहरी भागात नाही पण ग्रामीण भागातचं अधिकच्या दुर्घटना घडल्याचं दिसून येतं. गणेश भक्तांकडून कित्येक वेळेस नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडतातच.

सध्या गणेशोत्सवामुळे लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. काही जणांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसतो. त्यामुळे बुधवारी काहींनी गणेशाचे विसर्जन केले. यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जन करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.