‘जय भीम… एका महानायकाची गाथा’ : नव्या मालिकेत उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट

टीम AM : समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेले, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभी करणारे, संविधानातील मुलभूत हक्कांचा अधिकार देणारे महानायक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

त्यांचा जीवनपट पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना नव्याने मिळणार आहे. विविध विषयांवरील मालिकांमधून प्रबोधनातून मनोरंजन देणाऱ्या झी मराठी या वाहिनीवरून सुरू होत असलेल्या ‘जय भीम… एका महानायकाची गाथा’ या मालिकेतून डॉ. आंबेडकर यांचे कार्य उलगडणार आहे. आता ही मालिका कधी आणि कुठे पाहायला मिळणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

कार्यक्रम व मालिकांमधील वैविध्य, प्रबोधन आणि मनोरंजनाची योग्य सांगड आणि माहितीपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती यामध्ये झी मराठी वाहिनी नेहमीच अग्रेसर आहे. आपल्या अभ्यासू नेतृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तीमत्वांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा ह्या उद्देशाने आता झी मराठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महानायकाची गाथा मालिकेच्या रूपातून मांडण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘जय भीम… एका महानायकाची गाथा’ ही मालिका 25 सप्टेंबर पासून झी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार दुपारी 1 वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी मोलाचे कार्य केले आहे. आजपर्यंत डॉ. आंबेडकर यांचे कार्य विविध भाषांमधून मालिका, माहितीपटाच्या माध्यमातून छोट्या पडदयावर दाखवण्यात आले आहे. यामध्ये झी मराठीनेही आपले पाऊल टाकले असून महानायक डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील प्रसंग, घटना दाखवणारी ही मालिका उत्सुकतेचा विषय बनली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या बालपणापासून ते त्यांच्या विद्यार्थीदशेतील घटनांचा वेध घेण्याबरोबरच स्वातंत्र्यसंग्रामातील डॉ. आंबेडकर यांची भूमिका हा या मालिकेचा गाभा आहे.

स्वतंत्र भारताला संविधानाचा पाया देण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेला अभ्यास, दलित समाजाच्या उध्दारासाठी घेतलेले कष्ट यावर ही मालिका आधारीत आहे. डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याबरोबरच डॉ. आंबेडकर हे व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांचे कौटुंबिक आयुष्य कसे होते यावरही या मालिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे.