टीम AM : मराठी आणि बॉलिवूड अशा दोन्ही सिनेइंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री म्हणून पद्मा चव्हाण यांची ओळख आहे. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. 12 सप्टेंबर 1996 रोजी त्यांचं अपघाती निधन झालं. आज त्यांना जाऊन 28 वर्ष झाली आहेत. अगदी कमी कालावधीत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली होती.
पद्मा चव्हाण यांनी अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यानेही भुरळ घातली होती. त्यांना महाराष्ट्राची मर्लिन मनरो अशीही ओळख मिळाली होती. खुद्द आचार्य अत्रेंनीच त्यांना हा किताब दिला होता. सौंदर्याचं ॲटम बॉम्ब असंही त्यांनी म्हटलं होतं.
‘सासू वरचढ जावई’, ‘लग्नाची बेडी’, ‘गुपचूप गुपचूप’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तर हिंदीतील ‘कश्मीर की कली’ सारख्या प्रसिद्ध सिनेमात त्यांनी शम्मी कपूर, शर्मिला टागोर यांच्याबरोबर काम केले. पद्मा चव्हाण यांचा जन्म कोल्हापुरमध्ये झाला. सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांच्या त्या कन्या. लहानपणापासून पद्मा यांना कधी अभ्यासात रस आला नाही. प्राथमिक शिक्षण पूर्ण करुन त्या अभिनयाकडे वळल्या.
1959 साली वयाच्या 15 व्या वर्षीच भालजी पेंढारकर यांच्या ‘आकाशगंगा’ सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. नंतर त्यांनी ‘अवघाची संसार’, ‘देवघर’, ‘अशी असावी सासू’, ‘आराम हराम आहे’, ‘अनोळखी’ अशा अनेक सिनेमांत काम केलं. याशिवाय ‘अंगुर’, ‘नरम गरम’, ‘कश्मीर की कली’, ‘जीवनधारा’ अशा काही हिंदी सिनेमात काम करत बॉलिवूड गाजवलं.
1966 साली पद्मा चव्हाण दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्या. लग्नानंतरही त्यांचं काम सुरुच होतं. 1975 साली ‘या सुखांनो या’ आणि 1976 साली ‘आराम हराम है’ या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते. 12 सप्टेंबर 1996 रोजी त्यांचं अपघाती निधन झालं. आजही त्यांची आठवण काढली जाते, त्यांना अभिवादन.