टीम AM : मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच आंतरवेली सराटा येथे आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ अंबाजोगाई तालुक्यातील अच्युतराव इंगळेे, गणेश गंगणे, सतीश भगत हे 11 सप्टेंबरपासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.
आंतरवेली सराटा, जिल्हा जालना येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले आहेत. शांततेत चालू असलेल्या आंदोलनात मराठा आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून मराठा समाजात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातही अनेक ठिकाणी निषेधार्थ आंदोलने होत असून येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गणेश गंगणे, अच्युतराव इंगळे, सतीश भगत हे मराठा बांधव आमरण उपोषणास बसले आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यातील गावागावातून मराठा समाज बांधव उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवत आहेत. या उपोषणाला सर्वपक्षीय नेत्यांनी, संघटनांनी, कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.