शेतकरी, शेतमजुरांना शासनाने तात्काळ मदत करावी – अशोक पालके

पाटोदा येथे युवा आंदोलनाच्या वतीने रास्ता रोको

अंबाजोगाई : परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होवून शेतकर्‍यांची सर्व पिके वाया गेली आहेत. शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. शासनाने शेतकर्‍याला प्रति हेक्टरी 50 हजार रूपये आर्थिक मदत करून शेतमजुरांना व इतर व्यवसायातील मजुरांना शेतीत, तसेच ग्रामीण भागात काम नसल्याने उपासमारीची वेळ आल्याने त्यांना शासनाने 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून द्यावा. या प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील पाटोदा (म.) येथे युवा आंदोलनाचे अध्यक्ष अशोक पालके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार,दि. 5 नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पाटोदा (म.) येथे रास्ता रोकोला प्रशासनाच्या वतीने पाटोदा येथील तलाठी यांनी सामोरे जात आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. तसेच यावेळी रास्ता रोको आंदोलकांनी उपजिल्हाधिकारी यांच्या नावे दिलेले निवेदन स्विकारले.

सदरील निवेदनावर युवा आंदोलनाचे अध्यक्ष अशोक पालके, महासचिव धिमंत राष्ट्रपाल, हनुमंत गायकवाड, अक्षय भुंबे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. रास्ता रोको आंदोलनात अविनाश उगले, रत्नदीप सरवदे, अविनाश पाडूळे, विजय देशमुख, युनूस पठाण, कैलास भिंगोले, मारुती सरवदे, महादेव सरवदे यांचेसह पंचक्रोषीतील शेतकरी, शेतमजुर मोठ्या संख्येने सहभागी झाले. रास्ता रोकोमुळे अंबाजोगाई ते देवळा या मार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.