विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे मान्यवरांकडून कौतुक
अंबाजोगाई : थोर शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान व कला प्रदर्शनाचे न्यू व्हिजन पब्लिक स्कुल मध्ये दि.07 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले. यात 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध उपकरणे पाहुन मान्यवर व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
न्यू व्हिजन पब्लिक स्कुलमध्ये दरवर्षी विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य यु.डी.जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाला संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी,डॉ.डी.एच.थोरात, प्रा.वसंतराव चव्हाण, शाळेचे प्राचार्य रोशन नायर, डॉ.संदीप थोरात, डॉ.निलेश तोष्णिवाल, डॉ.गणेश तोंडगे, डॉ.संदीप मोरे, डॉ.विनोद जोशी यांच्यासहीत मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रदर्शनास अंबाजोगाई शहर व तालुक्यातील विविध शाळा, त्यांचे विद्यार्थी,शिक्षक,पालक मान्यवरांनी भेट दिली. या प्रदर्शनात सुमारे 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर अनेकांनी प्रत्यक्ष भेट देवून माहीती घेतली, पाहणी केली. या कला व विज्ञान प्रदर्शनात विविध विषयातील अनेक प्रतिकृती, थ्री डी शो, चार्ट, प्रयोग, लँग्वेज लॅब व त्या संदर्भातील वैज्ञानिक, भूमितीय, कलेशी निगडीत माहिती, चित्रकला, निसर्ग पेंटींग, कलाकुसर, पर्यावरण, वनस्पती, फळ व फुलांचे प्रकार,पक्षी, पाळीव व जंगली प्राणी, विविध रसायनांचे प्रयोग, नविन तंत्रज्ञान, अंतराळ शोध, संशोधन ,सौर ऊर्जेचा वापर, वाढते प्रदुषण, हवामानातील होणारे बदल, चुंबकशक्तीचे प्रयोग, डिजीटल सिटी, संगणकिय,इंटरनेट,मोबाईल क्रांती, दुरसंचार दळण-वळण, भारतीय अवकाश संशोधन व प्रमुख शोध, संगीत, क्रिडा, वैद्यकिय,आभियांत्रिकी आदी विषयातील माहिती तसेच काही विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक वेशभुषा करून मान्यवरांचे लक्ष वेधले. स्वता: विज्ञान उपकरण तयार करणा-या विद्यार्थ्यांशी संवाद साधून यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणने ऐकून, प्रयोग पाहून, जाणून घेतले व या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून त्यांचा आनंद द्विगुणित केला.
यावेळी इयत्ता 10 वर्गातील विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सानिका व सोनम यांनी केले तर दानेश्वरी हिने बातमीपत्र वाचन केले. झेबा व राजनंदीनी यांनी विज्ञान प्रदर्शनाविषयी माहिती दिली. उपस्थितांचे आभार अल्फिया हिने मानले. विज्ञान विषयाबरोबरच गणित, सामाजिक शास्त्र, मराठी,हिंदी, संस्कृत,संगीत व कला या सर्व विषयांचा समावेश विज्ञान प्रदर्शनात होता.गुरूवार,दि.7 नोव्हेंबर रोजी आयोजित हे प्रदर्शन सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत सर्वांसाठी खुले होते. या शाळेच्या विज्ञान प्रदर्शनासाठी मुख्याध्यापक प्राचार्य रोशन नायर व्यवस्थापक शिवकांत बेटगिरी,समन्वयक दत्तराज कुलकर्णी,परमप्रिया गायकवाड, विज्ञानप्रदर्शन प्रमुख पवन कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सर्व शिक्षकांचे सहकार्य यामुळे विज्ञान व कला प्रदर्शन यशस्विरित्या संपन्न झाले.