डॉ. प्रल्हाद गुरव यांना सह्याद्री आरोग्यरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान

सामाजिक दायित्वाचा सन्मान करणारा पुरस्कार – डॉ. गुरव

अंबाजोगाई : येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रल्हाद दत्तात्रय गुरव यांना अहमदनगर येथील सह्याद्री प्रतिष्ठानचा सह्याद्री आरोग्यरत्न हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते मंगळवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात वितरीत करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्रातील प्रख्यात समाजसेविका व विचारवंत सिंधुताई सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलतांना डॉ. गुरव म्हणाले की, खर्‍या अर्थाने हा सामाजिक दायित्वाचा सन्मान आहे.

अहमदनगर येथील सह्याद्री उद्योग समूह हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करणारी संस्था आहे. उद्योग क्षेत्रात देखील या संस्थेचा लौकिक आहे. या संस्थेने गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील काम करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करून प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्या अनुषंगाने अंबाजोगाई येथील योगेश्वरी मॅटीर्निटी होमचे प्रमुख प्रवर्तक डॉ. प्रल्हाद दत्तात्रय गुरव यांना यंदाचा सह्याद्री आरोग्यरत्न हा पुरस्कार गेल्या तीन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्या पुरस्काराचे वितरण मंगळवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी प्रख्यात विचारवंत सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते व राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप थोरात, ज्येष्ठ साहित्यिक कळंबकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांनी पुरस्कार प्राप्त डॉ. प्रल्हाद गुरव यांच्या वैद्यकीय सेवेचा गौरव करून त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रल्हाद गुरव हे गेल्या 12 वर्षांपासून अंबाजोगाई येथे योगेश्वरी मॅटिर्निटी होमच्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करीत आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्या या कामाला गती देण्यासाठी त्यांच्या अर्धांगिनी डॉ. रेखाताई गुरव यांची समर्थ साथ लाभलेली आहे. हा पुरस्कार सपत्निकपणे स्वीकारण्यात आला.

मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलतांना डॉ. गुरव म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे सामाजिक दायित्वाचा सन्मान करणारा व प्रतिष्ठा वाढवणारा आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये या परिसरातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांची सेवा करून त्यांच्या पदरी आलेले यश आणि रुग्णांच्या चेहर्‍यावर समाधान व आनंद हाच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. हा पुरस्कार माझ्या कामाला गती देणारा असणार आहे. अशी भावना डॉ. गुरव यांनी व्यक्त केली.