‘मराठा क्रांती मोर्चा’ ची बंदची हाक : अंबाजोगाईत शुकशुकाट, कार्यकर्ते रस्त्यावर

टीम AM : मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ‘मराठा क्रांती मोर्चा’ च्या वतीने आज बीड जिल्हा बंदची हाक दिली होती. अंबाजोगाईतही ‘मराठा क्रांती मोर्चा’ च्या वतीने जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध नोंदवित उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता. 

दरम्यान, ‘मराठा क्रांती मोर्चा’ च्या बंदच्या हाकेमुळे अंबाजोगाई शहरात आज सकाळपासूनच सर्व व्यवहार ठप्प होते. शहरातील सर्व बाजारपेठ बंद होती. बसस्थानकात शुकशुकाट होता. अंबाजोगाई बसस्थानकातून आज एकही गाडी सुटली नसल्याने प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली. शाळा – महाविद्यालयही बंद ठेवण्यात आले होते. ‘मराठा क्रांती मोर्चा’ चे कार्यकर्ते जागोजागी बंदचे आवाहन करीत होते. त्यामुळे अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्तेही आज ओस पडले होते. अंबाजोगाई तालुक्यातील आठवडी बाजारही बंद ठेवण्यात आले होते. शहरात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

‘मराठा क्रांती मोर्चा’ च्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील अंतरवली येथे मनोज जरांगे आणि इतर सहकारी उपोषणास बसले आहेत आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने या आंदोलनास पाठिंबा जाहीर देण्यात येत असून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये अंबाजोगाई तालुकाही सहभागी आहे. तरी आपण आपल्या स्तरावर शासनास याबाबत कळवावे व तात्काळ मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे ही आमची विनंती कळवावी. तसेच आज आंदोलनस्थळी झालेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदवत आहोत, याची नोंद घ्यावी. जरांगे पाटील यांना आणि आंदोलकांना त्रास देऊ नये व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी, या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात हि विनंती, असे निवेदनात म्हणटले आहे. या निवेदनावर ‘मराठा क्रांती मोर्चा’ च्या कार्यकर्त्यांच्या सहृया आहेत. ‘मराठा क्रांती मोर्चा’ च्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी यासह विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.