टीम AM : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे एकेकाळी ‘फॅशन आयकॉन‘ म्हणून ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री साधना यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म. 2 सप्टेंबर 1941 साली झाला. साधना शिवदासानी नय्यर तथा साधना यांचे नाव घेतले तरी कित्येकांच्या नजरेसमोर ‘मेरे मेहबूब’ चित्रपटातील नायक राजेंद्रकुमारकडे बुरख्याआडून पाहणारे बोलके डोळे उभे राहतात. या चित्रपटात पहिल्यांदाच नायक राजेंद्रकुमार यांची नायिकेशी गाठ पडते तेव्हा साधना यांचे बोलके डोळे त्यांचा आणि पर्यायाने प्रेक्षकांच्याही काळजाचा ठाव घेतात, हेच बोलके डोळे साधना यांचे अस्त्र होते.
प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नावावरून त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते. साधना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यशस्वी अभिनेत्री बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. कुटुंबाचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. वडिलांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली. 15 वर्षांच्या साधना यांना महाविद्यालयातील एका नाटकात भूमिका करताना काही निर्मात्यांनी पाहिले आणि चित्रपटांत काम करण्याची संधी दिली.
1958 मध्ये ‘अबाना‘ या भारतातील पहिल्या सिंधी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे मानधन म्हणून त्यांना एक रुपया मिळाला होता. त्याआधी 1955 साली त्यांनी राज कपूर यांच्या ‘श्री 420’ या चित्रपटातील ‘मुड मुडके न देख मुड मुडके’ या गाण्यावर केलेल्या नृत्याने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. प्रसिद्ध निर्माते शशिधर मुखर्जींनी साधना यांचा ‘स्क्रीन’ मॅगझिनमधील फोटो पाहून त्यांना आपल्या अभिनय प्रशिक्षण शाळेत प्रवेश दिला, आणि ‘लव्ह इन सिमला’ या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली.
अभिनेता जॉय मुखर्जी यांच्यासोबतचा हा चित्रपट खूप गाजला आणि साधना यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली. नितांत सुंदर वैदूर्यी डोळे, मोहक आणि मोनालिसासारखं गूढ हास्य हे साधना यांचे वैशिष्ट्य. त्यात भर पडली ती तिच्या आगळ्यावेगळ्या केशरचनेची. हॉलीवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्न प्रमाणे केसांच्या बटा कपाळावर रुळवण्याची फॅशन साधना यांनी आपलीशी केली व ‘लव्ह इन सिमला’ या चित्रपटातील त्यांची हेअरस्टाईल पुढे ‘साधना कट’ या नावाने रूढ झाली, इतकी की बिपाशा बसू, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, दीपिका पडुकोन आदी नव्या जमान्यातील नायिकांनाही या कटची भुरळ पडली व कधी ना कधी त्याचे अनुकरण करावेसे वाटले.
नायिकांसाठी घट्ट चुडीदार – कुर्ता ही सुध्दा साधना यांनीच रुढ केलेली फॅशन मानली जाते. या फॅशन रूपेरी पडद्यावरून नंतर समाजातही सहजतेने पाझरल्या. ‘लव्ह इन सिमला’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर. के .नय्यर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. 1995 मध्ये आर. के. नय्यर यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर साधना एकट्या पडल्या. अखेरच्या दिवसात त्या मुंबईतील एका जुन्या बंगल्यात भाड्याने राहत होत्या. हा बंगला आशा भोसले यांचा होता. साधनाला थायरॉईड आजार असल्याचे निदान झाले होते. यामुळे त्यांच्या डोळ्यांवरही परिणाम होऊ लागला. शेवटच्या दिवसात साधना विस्मृतीचे आयुष्य जगल्या.
साधना यांनी ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘अनीता’, ‘मेरा साया’ आणि ‘वो कौन थी’ या चित्रपटांमुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणूनच ओळखले जायचे. मनोज कुमार सोबत त्यांनी केलेल्या ‘वो कौन थी‘ चित्रपटातील त्यांचा डबल रोल खूप गाजला. या चित्रपटासाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ नामांकनही मिळाले. त्यांच्या वाट्याला अनेक सुंदर गाणीही आली. ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. ‘झुमका गिरा रे, बरेली के बाजार में‘, ‘आजा आई बहार, दिल है बेकरार‘, ‘लग जा गले‘ यांसारखी अनेक अजरामर गाणीही त्यांच्यावर चित्रित करण्यात आली. साधना यांचे 25 डिसेंबर 2015 रोजी निधन झाले.
शब्दांकन : संजीव वेलणकर