आरोग्य विभागात 11 हजार पदांसाठी भरती : नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुणांसाठी संधी 

टीम AM : राज्यात उद्यापासून आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागात 11 हजार पदांसाठी भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुणांना यासाठी आता चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत

आरोग्य विभागात कमी मनुष्यबळ असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. त्यामुळे सातत्याने याबाबतच्या तक्रारी येत होत्या. सरकार आणि आरोग्य विभाग लवकरच यावर तोडगा काढेल, अशी चर्चा होती. अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आरोग्य विभागात आता बंपर भरती होणार आहे. तब्बल 11 हजार पदांसाठी भरती केली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

आरोग्य विभागातील 11 हजार पदांसाठी उद्या आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीत अधिकाऱ्यांची देखील निवड होणार आहे. तसेच कर्मचारी वर्गासाठी देखील ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.