टीम AM : जुलै महिन्यात अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता ऑगस्ट महिना संपत आलेला असला तरी वरुणराजाचं पुनरागमन झालेलं नाही. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील पीकं करपण्यास सुरुवात झाल्याचं चित्र आहे.
तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक धरणांच्या पाणीपातळीत सतत घट होत असल्याने आगामी काळात महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रावर पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळं विभागातील अनेक धरणं ओव्हरफुल झाली होती. परंतू मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दडी मारली. परिणामी खरीप हंगामातील कापूस, मका, सोयाबीन ही पीकं आता करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं कर्ज काढून शेती करणारा बळीराजा या हंगामात चांगल्याच अडचणीत सापडला आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं राज्य तसेच केंद्र सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे.