‘स्वाराती’ च्या 4 विभाग प्रमुखांच्या बदल्यांना स्थगिती : पुर्ववत कामकाज सुरु करण्याचे आदेश

टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या 5 विभागप्रमुखांच्या झालेल्या बदल्यांपैकी चार विभागप्रमुखांनी मॅट न्यायालयातून स्थगिती मिळवल्यानंतर अधिष्ठाता यांनी या 4 विभागप्रमुखांना रुजू करून घेत पुन्हा आपले कामकाज सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाच विभागप्रमुखांच्या बदल्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचालनालयाच्या वतीने नुकत्याच करण्यात आल्या होत्या. या पाच विभागप्रमुखांपैकी डॉ. सिध्देश्वर बिराजदार, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. अभिमन्यु तरकसे आणि डॉ. मुकुंद मोगरेकर यांनी औरंगाबाद येथील मॅट न्यायालयातून सदरील बदली आदेशावर स्थगिती मिळवली होती. सदरील स्थगिती आदेश त्यांनी अधिष्ठाता कार्यालयात सादर केल्यानंतर अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी एका आदेशान्वये या चारही विभागप्रमुखांना पुर्ववत सेवेत रुजू होण्याचे आदेश काढले आहेत. 

अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी काढलेल्या आदेशान्वये मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, नाक – कान – घसा विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे, भुलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अभिमन्यु तरकसे आणि पॅथॉलाजी विभाग प्रमुख डॉ. मुकुंद मोगरेकर यांनी पुर्वीप्रमाणे विभाग प्रमुख म्हणून आपले कामकाज सुरु केले आहे. या पाच विभागप्रमुखांपैकी फिजिऑलॉजी विभागप्रमुख डॉ. सुनिता हंडरगुळे या लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाल्या आहेत.