हॉटेलला लागली आग : 3 जणांचा मृत्यू

टीम AM : मुंबईत आगीच्या दुर्घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील प्रभात कॉलनीतील एका हॉटेलला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गॅलेक्सी या चार मजली हॉटेलला आग लागली. या आगीत भाजून पाच जण जखमी झाले. या जखमींना सांताक्रुज पूर्वेकडील पालिकेच्या वी. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखले करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

हॉटेलला आग लागल्याच्या घटनेची माहिती सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

हॉटेलमधील तिसऱ्या मजल्यावर ती आग लागली असून हॉटेलमधील मुक्कामी थांबलेल्या इतर ग्राहकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या आगीत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती देखील पुढे आली आहे.