राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमचेच नेते : शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

टीम AM : राष्ट्रवादीत फूट नसून अजित पवार आमचेच नेते आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत बोलताना केले आहे. पवारांच्या या वक्तव्याने राजकीय वतुर्ळात चर्चेला उधाण आले आहे.

‘ते (अजित पवार) आमचे नेते आहेत. आमच्यात वाद नाही. राष्ट्रवादीत फूट नाही. पक्षात फूट कधी पडते ? जेव्हा राष्ट्रीय स्तरावर एखादा मोठा गट पक्षापासून वेगळा होतो तेव्हा असे घडते. मात्र राष्ट्रवादीत आज तशी परिस्थिती नाही. काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली पण याला फूट म्हणता येणार नाही. लोकशाहीत ते असे करू शकतात, असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांच्या भूमिकेचे एकप्रकारे समर्थनच केले आहे.

अजित पवार यांनी भाजपासोबत वेगळी चूल मांडली. तेव्हापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच नाही तर जनताही या पक्षातील नेत्यांच्या विधान आणि भूमिकांमुळे संभ्रमात आहे. शरद पवारांच्या या विधानाने एकूणच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.