टीम AM : मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्न, विकास कामांचा आढावा आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठकीची सातत्याने मागणी होत आहे. अखेर या बैठकीला मुहूर्त लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठवाड्यात गेल्या 15 वर्षांमध्ये फक्त दोन वेळा मंत्रिमंडळ बैठक झाली आहे. मराठवाड्याचे भूमिपूत्र दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात 2008 साली बैठक झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये युतीकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये औरंगाबादला बैठक झाली होती. त्यानंतर सात वर्षांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होण्याचे संकेत मिळत आहेत.
तब्बल सात वर्षानंतर औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने मराठवाड्यात नियोजन सुरु करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठक येत्या 16 सप्टेंबरला म्हणजे मराठवाडा मुक्ती दिनाच्या एक दिवस आधी होण्याची शक्यता आहे. याबद्दल शासनाकडून तोंडी निरोप मिळाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या आठवड्याच्या शेवटी नियोजनाचे अधिकृत पत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.