आयएएस तुकाराम मुंडे ‘ॲक्शन’ मोडमध्ये : दुधात भेसळ केल्यास होणार कारवाई 

टीम AM : दुधात होणाऱ्या भेसळीविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हावार धडक मोहिम राबविण्याचे निर्देश दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत. त्यानुसार मराठवाडा विभागातील सर्व आठ जिल्ह्यात दुध तपासणीची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. 

तसेच दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई देखील केली जात आहे. त्यामुळे, सर्व दुध विक्रेते, दुध व दुग्धजन्य पदार्थ, उत्पादक यांनी उच्च गुणप्रतीच्या दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सणासुदीच्या काळात भेसळ वाढते

पुढील काही काळात सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे अशा काळात दुग्धजन्य पदार्थात भेसळ होण्याची अधिक शक्यता असते. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी भेसळ करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येते. मात्र, चोरट्या मार्गाने सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन विभागासह दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धडक मोहीम हाती घेण्यात येणार आहे.