केंद्र सरकारचा मोठा निर्णय : यापुढे बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा होणार, 11 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमातही बदल

टीम AM : देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने शालेय शिक्षणाबाबत मोठे बदल जाहीर केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदींची अंमलबजावणी करताना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षण – परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. शिक्षण मंत्रालयाने बुधवारी ही महत्वाची माहिती दिली.

शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार , बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जातील. त्याचसोबत 11 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले आहेत. तसंच, विद्यार्थ्यांना दोन्ही सेमिस्टरचे सर्वोत्तम गुण निवडण्याची परवानगी दिली जाईल.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण मंत्रालयाच्या नवीन परीक्षा पॅटर्नवर आधारित बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या विषयांचे आकलन आणि त्यांच्या स्पर्धात्मक कामगिरीचे (अचिव्हमेंट ऑफ कॉम्पिटेंसीज) मूल्यांकन करेल. मंत्रालयाने हे मान्य केले आहे की, सध्या बोर्डाच्या परीक्षा या केवळ महिन्यांपर्यंत कोचिंगद्वारे केलेली तयारी आणि विद्यार्थ्यांची लक्षात ठेवण्याची क्षमता यावरच आधारित असते.

शिक्षण मंत्रालयाने केलेल्या महत्त्वाच्या बदलांनुसार आता इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना स्ट्रीम निवडण्याची सक्ती आता काढून टाकण्यात आली आहे. अशा स्थितीत या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्यास मोकळेपणा मिळेल. सध्या सर्वच मंडळांच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक इत्यादींपैकी एकाची निवड करावी लागते.

तसंच, 2024 च्या शैक्षणिक अभ्यासक्रामासाठी त्याप्रमाणेच पाठ्यपुस्तके विकसित केली जातील असे देखील शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यापैकी किमान एक भाषा भारतीय असणं आवश्यक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, सध्या केंद्रीय बोर्ड असो की राज्य मंडळ यांच्या सर्व परीक्षा वर्षातून एकदाच घेतल्या जातात. पण अंतर्गत मूल्यांकन आणि सहामाही परीक्षा शाळांद्वारे घेतल्या जातात.