टीम AM : साऊथचे मेगास्टार अर्थात चिरंजीवी यांचा आज (22 ऑगस्ट) वाढदिवस आहे. आज अभिनेत्याने 70 व्या वर्षात पदार्पण केले आहे. तब्बल 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे चिरंजीवी 1650 कोटींचे मालक आहेत. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच लोकांचे मन जिंकून घेतले.
साऊथमध्ये त्यांची इतकी क्रेझ आहे की, त्यांच्या चित्रपटांची तिकीटं मिळवण्यासाठी अक्षरशः लोकांमध्ये हाणामाऱ्या व्हायच्या. त्यांचे खरे नाव कोनिडेला शिव शंकर वरप्रसाद राव. मात्र, मनोरंजन विश्वात पदार्पण केल्यानंतर त्यांना चिरंजीवी याच नावाने ओळखले गेले.
‘कैदी’ या 1983 मध्ये आलेल्या चित्रपटाने चिरंजीवी यांना रातोरात सुपरस्टार बनवले. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांची बोलण्याची शैली आणि त्यांची स्टाईल सगळ्यांमध्येच लोकप्रिय झाली. तेव्हापासूनच चिरंजीवी यांना मेगास्टार चिरंजीवीचा टॅग मिळाला. केवळ अभिनयच नव्हे, तर नृत्यासाठी देखील ते प्रसिद्ध आहेत. नृत्याची प्रेरणा त्यांना प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना हेलन यांच्याकडून मिळाली आहे. हेलन यांचे नृत्य पाहून त्यांनी ही कला आत्मसात केली आहे. हेलन यांना पडद्यावर नृत्य करताना पाहून चिरंजीवी यांना देखील नृत्याची आवड निर्माण झाली.
चिरंजीवी यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांचा एखादा नवा चित्रपट आला की, प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी तिकिटांसाठी अक्षरशः चेंगराचेंगरी होते. 2003 मध्ये त्यांचा ‘टागोर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटाच्या तिकिटांसाठी चेंगराचेंगरी झाली होती. यात 4 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर जेव्हा चिरंजीवी यांचा 150 वा चित्रपट ‘खिलाडी नंबर 150’ प्रदर्शित झाला तेव्हा देखील तिकीटांसाठी सगळीकडे झुंबड उडाली होती. चाहते खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते.
या चित्रपटाची इतकी क्रेझ होती की, दोन दिवस अगोदरच तिकिटांसाठी चाहते चित्रपटगृहाबाहेर उभे होते. सुरुवातीच्या दिवसांची सर्व तिकिटे आधीच बुक झाली होती. पहिल्या दिवशी अनेकांना पहिल्या शोचे तिकीट मिळाले नव्हते. याच दु:खात एका व्यक्तीने आत्महत्या देखील केली होती. साऊथमध्ये अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मानधन घेणारे अभिनेते म्हणून चिरंजीवी यांचं नाव घेतलं जातं.