आईच्या पावलावर ठेवलं पाऊल : मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या सायरा बानो ! वाचा अभिनेत्रीबद्दल..

टीम AM : सायरा बानो बॉलिवूडच्या अशा प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या स्टाईलने प्रेक्षकांना त्यांचे चाहते बनवले आहे. सायरा बानो आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 रोजी भारतात झाला. त्यांच्या आई नसीम बानो या देखील त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचे वडील मियां एहसान – उल – हक हे चित्रपट निर्माते होते. त्यांनी ‘फूल’ आणि ‘वादा’ चित्रपटाची निर्मिती केली होती. अर्थात अभिनयाचा वारसा सायरा यांना कुटुंबाकडूनच मिळाला होता.

लहान वयातच सायरा लंडनला शिक्षणासाठी गेल्या होत्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. सायरा यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी नेहमीच एक यशस्वी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले होते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढे चित्रपटातच काम करण्याचा निर्णय घेतला.

वयाच्या 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनेत्री सायरा बानो यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 1961 मध्ये अभिनेते शम्मी कपूर यांच्यासोबत ‘जंगली’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांच्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू अशा प्रकारे पसरली की, त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. या चित्रपटासाठी सायरा यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या यशामुळे सायरा मनोरंजन सृष्टीच्या लाडक्या बनल्या. यानंतर त्यांना एकामागून एक हिट चित्रपट मिळत गेले. 60 आणि 70 चे दशक सायरा यांच्यासाठी सुवर्णकाळ ठरले.

बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणना

सायरा यांची गणना बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जात होती. सायरा यांच्या करिअरसाठी 1967 हे वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. या वर्षी त्यांचे ‘दीवाना’ आणि ‘शागिर्द’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. 1968 साली प्रदर्शित झालेला ‘पडोसन’ हा चित्रपट सायरा बानोच्या सिनेकरिअरमधील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली.

दिलीप कुमार यांच्यावर जडला जीव ! 

चित्रपटांपेक्षा सायरा बानो दिलीप कुमार यांच्यासोबतच्या नात्यामुळे चर्चेत राहिल्या. सायरा यांना लहान असल्यापासून आईप्रमाणे अभिनेत्री व्हायचे होते. मात्र, वयाच्या 12 व्या वर्षापासून सायरा यांना दिलीप कुमार आवडू लागले होते. जेव्हा, सायरा यांनी आपले प्रेम व्यक्त केले तेव्हा, सायरा 22 वर्षांच्या तर, दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. मात्र, प्रेमात दोनदा अपयशी ठरलेल्या दिलीप कुमार यांनी सायरामध्ये अजिबात रस दाखवला नव्हता. वयाच्या फरकामुळे दिलीप या नात्यापासून दूर जात होते. पण, सायरा यांच्या प्रेमासमोर त्यांनी हार मानली आणि 1966 मध्ये त्यांनी आपले प्रेम जाहीर केले आणि लग्न केले.