वाघाच्या शोधाची थरारक कहाणी : ‘टेरिटरी’ चित्रपट 1 सप्टेंबरला होणार प्रदर्शित

टीम AM : विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ‘टेरिटरी’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर  लॉन्च करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी स्टारकास्ट असून 1 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. निर्माते श्रीराम मुल्लेमवार यांच्या डिव्हाईन टच प्रॉडक्शन्सतर्फे हा चित्रपट प्रस्तुत करण्यात आला आहे.

लेखक – दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी फिलिपिन्स मधील इंटरनॅशनल ॲकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनमधून चित्रपटाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. बऱ्याच चित्रपटांसाठी सहायक म्हणून काम केल्यानंतर आता ते ‘टेरिटरी’ या चित्रपटातून पदार्पण करत आहेत.

कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ग्रीन ॲकॅडमी ॲवॉर्ड्स, गोल्ड फर्न फिल्म ॲवॉर्ड्स अशा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये चित्रपट दाखवला गेला आहे, पारितोषिकप्राप्त हा चित्रपट ठरला आहे. कृष्णा सोरेन यांनी चित्रपटाचं छायांकन, मयूर हरदास यांनी संकलन, महावीर सब्बनवार यांनी ध्वनि आरेखन, यश पगारे यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जंगलात नरभक्षक झालेला वाघ जंगलातून गायब होतो, या नरभक्षक वाघाला मारण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी दिली जाते आणि एक थरारक शोध सुरु होतो. यावर हा चित्रपट आहे.