भाड्याच्या कारणावरून मानसिक त्रास : हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

चौघाविरुध्द अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टीम AM : जागेच्या भाड्याच्या कारणावरून मानसिक त्रास दिल्याने एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. 4 जुलै रोजी शहरातील आनंद नगर परिसरात घडली होती. याप्रकरणी चौघा विरुद्ध बुधवारी (दि. 9) अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील आनंदनगर परिसरात राहणारे प्रसाद प्रभाकर पाठक (वय 40) यांनी डॉ. नंदकुमार देशपांडे यांच्या चौसाळकर कालनी येथील जागेत ‘आपली आवड’ या नावाने हॉटेल सुरु केले होते. सदरील जागा पंधरा वर्षासाठी किरायाने व किराया ठरवून घेतली होती. असे असतांना हॉटेलचा किराया वेळोवेळी वाढवून मयत प्रसाद पाठक यांना मानसिक त्रास देण्यात येत होता. या मानसिक त्रासाला कंटाळून प्रसाद पाठक यांनी आपल्या राहत्या घरावरील गच्चीच्या आडूला गळफास लावून दि. 4 जुलै रोजी आत्महत्या केली होती. 

या प्रकरणी मयत प्रभाकर पाठक यांचा मुलगा दीपक प्रभाकर पाठक यांच्या फिर्यादीवरून डॉ. नंदकुमार देशपांडे, ज्योती नंदकुमार देशपांडे, मकरंद पांडुरंग कुलकर्णी व साक्षांत अरुण देशपांडे (रा. सर्व अंबाजोगाई) यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. 304/2023 कलम 306, 34 भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चॉंद मेंडके करीत आहेत.