सुनील शेट्टी झाला 62 वर्षांचा : जाणून घ्या कोट्यवधींचा मालक असणाऱ्या अभिनेत्याबद्दल

टीम AM : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचा आज 62 वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी कर्नाटकमध्ये झाला. सुनीलचं पूर्ण नाव सुनील वीरप्पा शेट्टी असं आहे. सुनीलनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुनील त्याच्या फिटनेसनं आणि स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. तर अनेक वेळा आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतो. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या आयुष्यातील खास गोष्टी…

हिट चित्रपटांमध्ये केलं काम

सुनीलनं 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बलवान’ या चित्रपटामधून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 1994 मध्ये रिलीज झालेला ‘मोहरा’  हा सुनीलचा पहिला हिट चित्रपट ठरला. त्यानंतर 1994 मध्येच दिलवाले चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामधील अभिनयासाठी सुनीलला अनेक पुरस्कार मिळाले. ‘सुरक्षा’, ‘टक्कर’, ‘रक्षक’, ‘सपूत’ , ‘पहचान’, ‘गोपी किशन’, ‘दिलवाले’, ‘कृष्णा’, ‘बॉर्डर’, ‘भाई’, ‘हु तू तू’, ‘रिफ्यूजी’, ‘कांटे’, ‘कयामत’, ‘मैं हूं ना’, ‘हलचल’, ‘शूटआउट एट लोखंडवाला’, ‘आवारा पागल दीवाना’, ‘फिर हेरा फेरी’, ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटामध्ये सुनीलनं काम केलं. 

कोट्यवधींचा मालक

सुनील हा अभिनेता असला तरी तो बिझनेसमॅन देखील आहे. सुनीलची हाउस पॉपकॉर्न एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. तसेच त्याचे स्वत:चे एक हॉटेल देखील आहे. एका रिपोर्टनुसार, सुनील 100 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. सुनीलचं खंडाळा येथे फार्म हाऊस देखील आहे. मर्सिडीज GLS 350 D, हमर, रेंज रोव्हर वोग या लग्झरी गाड्या सुनीलकडे आहेत. 

1991 मध्ये सुनीलनं माना शेट्टीसोबत लग्न केलं. लग्नाआधी सुनील आणि माना हे आठ वर्ष एकमेकांना डेट करत होते. सुनील आणि मानाला अथिया आणि अहान ही दोन मुलं आहेत. त्यांची दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रात काम करतात.