टीम AM : दादरमधील इंदू मिलच्या जागेवरील आंतरराष्ट्रीय स्मारकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंच पुतळा उभारण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी त्यांच्या गाझियाबाद येथील शिल्पशाळेत बाबासाहेबांच्या 25 फूट उंचीच्या पुतळ्याची प्रतिकृती तयार केली आहे.
16 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसंच आंबेडकरी चळवळीतील मान्यवर व्यक्ती यांना सोबत घेत गाझियाबाद येथील शिल्पशाळेतील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार 6 एप्रिल रोजी या प्रतिकृतीची पाहणी करुन, त्यास संमती देण्यात आली.
आता राज्य शासनाकडून गाझियाबाद शिल्पशाळेतील 25 फुटी प्रतिकृतीच्या धर्तीवर दादरच्या इंदू मिलच्या जागेवरील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंचीचा पुतळा बसविण्यास मान्यता दिली आहे. गुरुवारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून त्यासंबंधीचा आदेश काढण्यात आला आहे.