टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभागप्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार आणि फिजिऑलॉजी विभागप्रमुख डॉ. सुनिता बिराजदार यांची अंबाजोगाई येथुन बदली करण्यात आल्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचालनालयाच्या वतीने काढण्यात आले आहेत. दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालय हे आशिया खंडातील एकमेव मोठे रुग्णालय आहे, यामुळे बदल्यांचा परिणाम रुग्णसेवेवर होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचालनालयाच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी सदरील आदेश काढण्यात आले आहेत. डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. धोंडिबा भुरके यांची बदली करण्यात आली आहे.
डॉ. सुनिता हंडरगुळे (बिराजदार) यांची बदली विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. शैलेश भावे यांची बदली करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संचालनालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या या आदेशावर अवर सचिव मनोहर बंदपट्टे यांची स्वाक्षरी आहे.
‘यांच्या’ झाल्या बदल्या….
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या पाच विभागप्रमुखांच्या बदल्यांचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचालनालयाच्या वतीने काढण्यात आले आहेत. यामध्ये मेडिसीन विभागप्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, डॉ. सुनिता हंडरगुळे (बिराजदार), नाक – कान – घसा विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे – लातुर, डॉ. मुकुंद मोगरेकर – जळगाव, भुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यु तरकसे यांची नागपुर येथे बदली करण्यात आली आहे. तर नंदुरबार येथील पॅथॉलॉजी विभागप्रमुख यांची परत अंबाजोगाई येथे बदली करण्यात आली आहे.