टीम AM : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यव्यापी सर्वेक्षण झाले. यात मराठवाड्यातील सर्वाधिक स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक म्हणून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बसस्थानकाची निवड झाली आहे. गेल्या वर्षी अंबाजोगाई बसस्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदाही अंबाजोगाई बसस्थानकाने मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने बसस्थानकाच्या विकासासाठी 10 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.
प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी वेळेवर पोहोचवण्याचे काम ‘लालपरी’ करते. पण अनेकदा राज्यातील बसस्थानकांमध्ये घाणीचे साम्राज्य, पाण्याची व्यवस्था यासह योग्य ते नियोजन नसल्याच्या गोष्टी आपण पाहिल्या असतील. प्रत्येक जिल्ह्यात आजही घाणीचा विळखा घातलेली बसस्थानके दिसून येतात. नागरिकांना या बस स्थानकामधूनच जावे लागते.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक या अभियानांतर्गत राज्यातील 581 पैकी 560 बसस्थानकातील सर्वेक्षण पूर्ण झाले. पहिल्या टप्प्याअंतर्गत राज्यातील 291 स्थानकातील स्वच्छतेचा दर्जा वाईट असून केवळ 28 स्थानकांमध्ये चांगल्या प्रकारचीं स्वच्छता राखली जात आहे, असे वास्तव एसटी महामंडळाच्या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
सर्वात स्वच्छ अंबाजोगाई बसस्थानक
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे बसस्थानक सर्वात स्वच्छ आणि सुंदर ठरले आहे. या बसस्थानकाने मराठवाड्यातील बसस्थानकांच्या पाहणीत 100 पैकी 76 गुण प्राप्त केले आहेत. त्यामुळे हे बसस्थानक सध्या संपूर्ण मराठवाड्यात आदर्श स्थानक बनले. मराठवाड्यातील सर्वाधिक अव्वल स्थानावर अंबाजोगाई बसस्थानक असल्याचे या सर्वेक्षणातून अधोरेखीत झाले आहे, असे विभागीय नियंत्रक अजय कुमार मोरे यांनी सांगितले.