टीम AM : बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा स्वतंत्र जाहीर करावा, या मागणीसाठी पुन्हा एकदा अंबाजोगाईकर एकवटले असून जिल्हा निर्मितीसाठी व्यापक जनआंदोलन करण्याचा निर्धार जिल्हा कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याची घोषणा कृती समितीच्या वतीने करण्यात आली असून या आंदोलनात अंबाजोगाईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी शहरातील नगरपरिषद सभागृहात आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी बैठक पार पडली. या बैठकीला राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, वकील संघ, पत्रकार संघ, मेडिकल असोसिएशन यासह मोठ्या संख्येने अंबाजोगाईकर उपस्थित होते.
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्यासाठी असणारी सर्व पुरक कार्यालये इथे अस्तित्वात आहेत, तरीही जिल्हा झाला नाही. आजपर्यंत सातत्याने जिल्हा निर्मितीचे आंदोलने विविध माध्यमातून सुरूच आहेत. आतापर्यंत बहुतांश मुख्यमंत्र्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. आगामी काळात या संदर्भात ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत करण्यात आला आहे. या बैठकीला युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.