अभिनेत्री काजोलचा वाढदिवस : बॉयफ्रेंडची तक्रार अजयकडे करायची, जाणून घ्या काजोलची ‘लव्हस्टोरी’

टीम AM : एकेकाळी अभिनय कौशल्याने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. काजोलचा मस्तीखोरपणा सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा. आई – वडिलांकडूनच अभिनयाचे बाळकडू तिला मिळाले होते. तिचे वडील सोमू मुखर्जी हे दिग्दर्शक होते तर आई तनुजा ही अभिनेत्री होती. 

लहानपणीच काजोलला चित्रपटांची आवड निर्माण झाली. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 1992 मध्ये तिने ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. 

दोन महिने उन्हाळ्याच्या सुट्टीत शूटिंग करायचे आणि त्यानंतर पुन्हा शाळा असा तिचा प्लॅन होता. मात्र तिने शिक्षण सोडले आणि अभिनयातच पूर्णवेळ करिअर करण्यावर लक्ष केंद्रीत केले. आज 5 ऑगस्ट रोजी काजोलचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी…

काजोल आणि अजय देवगणची पहिली भेट 1995 साली ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. काजोलने स्वत: एका मुलाखतीमध्ये अजय सोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला होता. ‘मी शुटिंगसाठी तयार होऊन बसले होते. मी सेटवर काम करणाऱ्यांना माझ्यासोबत कोणता हिरो दिसणार आहे, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी कोणी तरी अजय देवगणकडे बोट दाखवले. तो एका कोपऱ्यात जाऊन बसला होता. नंतर हळूहळू आमच्यामध्ये मैत्री झाली’ असे काजोल म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘जेव्हा मी अजयच्या आयुष्यात आले तेव्हा तो दुसऱ्या मुलीला डेट करत होता. तसेच मी देखील माझ्या बॉयफ्रेंडची तक्रार त्याच्याकडे करायची. त्यानंतर माझा ब्रेकअप झाला. आम्ही दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलेले नाही. पण आम्ही एकत्र असल्याचे आम्हाला वाटायचे.’

जवळपास 5 वर्षे डेट केल्यानंतर काजोल आणि अजयने एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला काजोलच्या घरचे या लग्नासाठी तयार नव्हते. तिच्या वडीलांनी चार दिवस तिच्याशी अबोला धरला होता. पण नंतर काजोलच्या घरातले सगळे तयार झाले. 1999 साली खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला.