टीम AM : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
देसाई यांच्या आत्महत्येवर कलाक्षेत्र, राजकीय क्षेत्र व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नितीन देसाई यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी भव्य – दिव्य सेट उभारले होते. दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं होतं. असं असताना त्यांच्यावर मृत्यूपूर्वी तब्बल 249 कोटींचं कर्ज होतं, अशी माहिती आता समोर आली आहे.
दिग्दर्शक नितीन देसाई यांचा मृतदेह बुधवारी सकाळी एन. डी. स्टुडिओमधील त्यांच्या खोलीत आढळून आला. सफाई कर्मचारी खोलीत साफसफाईसाठी गेले असताना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने पोलीसांना या घटनेची माहिती कळवली. यानंतर कर्जत आणि खालापूर येथील पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. दरम्यान या घटनेचे सर्व पैलू तपासून पाहत असल्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे.