हजारों कुटुंबांना दिलासा : 2011 च्या आधीची गावठाण, सरकारी जागेवरील निवासी अतिक्रमणे नियमित होणार

टीम AM : सरकारचा लोकप्रिय घोषणांचा धडका सुरूच असून 2011 आधीच्या गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांना नियमित केले जाणार आहे.

मागील आठवड्यात या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भातील निर्णय झाला असून लवकरच शासन निर्णय प्रकाशित केला जाणार असल्याची एक्सलुझिव्ह माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला महसूलमंत्री, ग्रामविकासमंत्री, विभागांचे सचिव उपस्थित होते. मागच्या सरकारच्या काळात गावठाण आणि शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण झाले असेल तर ते नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही.

मात्र, मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत निवासी अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लाखो गोरगरिबांना, झोपडपट्टीधारकांना त्याचा लाभ होणार आहे. येत्या काही दिवसात सरकारकडून याबाबतचा आदेश जारी होणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली.