वडिलांचा विरोध अन् दोन तासात लग्न : जाणून घ्या मीना कुमारी विषयी काही खास गोष्टी..

टीम AM : बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन म्हणून अभिनेत्री मीना कुमारी ओळखली जाते. आरस्पानी सौंदर्यामुळे बॉलिवूडमध्ये राज्य करणाऱ्या मीना कुमारीने वयाच्या 38 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आज मीना कुमारी यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया मीना कुमारीच्या आयुष्यातील काही खास गोष्टी..

मीना कुमारीचा जन्म 1 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईत झाला. तिने वयाच्या सातव्या वर्षापासून अभिनय करण्यास सुरुवात केली होती. मीना कुमारीचे ‘पाकिजा’, ‘परिणीता’ , ‘शारदा’, ‘आज़ाद’, ‘दायरा’, ‘दो बीघा जमीन’ आणि इतर काही चित्रपट तुफान हिट ठरले होते. चित्रपट करत असतानाच तिची ओळख दिग्दर्शक कमाल अमरोशी झाली. त्यांना आगामी चित्रपटात मीना कुमारीला कास्ट करायचे होते. मात्र, कमालचा स्वभाव आवडत नसल्यामुळे तिने नकार दिला. कसेबसे वडिलांनी मनवल्यावर मीना कुमारी तयार झाली होती.

दरम्यान, एकत्र काम करत असतानाच मीना कुमारी आणि कमाल यांचे सूत जुळले. मात्र, कमाल पूर्वीपासूनच विवाहित असल्यामुळे मीना कुमारी आणि कमाल यांच्या नात्याचा मीना कुमारी यांच्या वडिलांनी विरोध केला होता. कमाल यांच्या मित्राने मीनाकुमारी यांची समजूत काढल्यानंतर कमाल आणि मीनाकुमारी यांनी पळून जाऊन लग्न केले.

मीना कुमारी या रोज 8 ते 10 या वेळात क्लासला जायच्या. त्यामुळे त्यांनी दोन तासात जाऊन लग्न आटोपले होते. घाईघाईमध्ये 14 फेब्रुवारी 1952 रोजी केवळ दोन तासात मीना कुमारी आणि कमल यांनी लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. 1964 साली त्यांनी घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतर मीना कुमारी यांनी अभिनय करणं सुरु ठेवलं. पण, त्याच सोबत त्यांना दारुचंही व्यसन जडलं होतं. त्यांच्या मद्यपानाचं प्रमाण इतकं वाढलं की त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडू लागली. परिणामी, त्यांना गंभीर आजार झाला. त्यांचा हा आजार इतका वाढला की त्यांना लिव्हर सिरोसिस झाला. या आजारपणातही औषधांऐवजी त्या दारु प्यायच्या. या शेवटच्या दिवसांमध्येही त्या एकट्याच होत्या. अखेर एकटेपण, अतिमद्यपान यामुळे 31 मार्च 1972 रोजी मीना कुमारी यांचे निधन झाले.