टीम AM : वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा,’ असे बनावट मेसेज नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. यात वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्सॲप मेसेज किंवा ई – मेल पाठवण्यात येत नाहीत, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी सायबर सेलमध्ये याआधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी 24 तास सुरू असलेल्या 1912, 1800 – 212 – 3435 किंवा 1800 – 233 – 3435 या टोल फ्री क्रमांक किंवा जवळच्या कार्यालयांशी संपर्क साधावा. तसेच असे मेसेज आल्यास cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.