टीम AM : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी पहाटे मोठी दुर्घटना घडली. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने 17 मजूर ठार झाले आहेत. तर क्रेन आणि स्लॅब खाली अनेक जण दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, तातडीने मदतीसाठी ‘एनडीआरएफ’ च्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहचल्या असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गाच्या ठाणे ते शिर्डी या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सरु आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास देखील समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते. त्यावेळी शाहपूर सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर आणि क्रेन अचानक कोसळली. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन खाली असलेल्या मजूरांवर कोसळली. यात 17 मजूरांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. 16 मृतदेह हे शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तर तीन ते चार जण जखमी मजुरांवर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.