भावाच्या 6 लाख रुपयांवर बहिणीने मैत्रिणीला सोबत घेत मारला डल्ला : गुन्हा दाखल

टीम AM : मैत्रिणीला नौकरीसाठी पैशाची गरज असल्याने घरचे लोक पैसे देणार नाहीत, म्हणून भावाने कपाटात ठेवलेल्या 6 लाख रुपयांची चोरी मैत्रिणीला सोबत घेऊन बहीनीनेच केल्याचा धक्कादायक प्रकार अंबाजोगाईत घडला आहे. तब्बल दोन महिन्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

अंबाजोगाई शहरातील मोंढा मार्केट परिसरात राहणारे तक्रारदार सर्वेश विजयकुमार लोहिया यांनी आपल्या व्यापाराची रक्कम कपाटात ठेवलेली होती. पुणे येथे एका कंपनीमध्ये फॅशन डिझायनर म्हणून काम करणारी त्यांची बहीण निकिता लोहिया 31 मे 2023 रोजी अंबाजोगाई येथे सुट्टी असल्याकारणाने आली होती. दरम्यान 11 जून 2023 रोजी निकिताची मैत्रीण नंदिनी बॅनर्जी ही निकिताला भेटण्यासाठी अंबाजोगाईत आली. नंदिनी बॅनर्जी हीला नोकरीची ऑर्डर आली असल्याने तिला दहा लाख रुपयांची नितांत आवश्यकता असल्याचे निकिता लोहिया हीने कुटुंबीयांना सांगितले. परंतू, तिला पैसे देण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. निकिता लोहिया आणि तिची मैत्रीण नंदिनी बॅनर्जी या दोघींनी संगणमत करून कपाटात ठेवलेले नगदी सहा लाख रुपये चोरी केले व पुणे येथे निघून गेल्या. कपाटात ठेवलेली रक्कम सापडत नसल्याने हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी फिर्यादी भावाने बहीण व तिची मैत्रीण या दोन्ही महिलांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दि. 29 जूलै रोजी गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विनोद घोळवे करीत आहेत.