मंदाकिनीचा वाढदिवस : ‘त्या’ घटनेमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’

टीम AM : यास्मीन जोसेफ हे नाव उच्चारल्यावर कदाचित तुम्हाला आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय हे कळणार नाही. पण जर मंदाकिनी हे नाव घेतलं तर लगेच ती अभिनेत्री आठवेल. आज मंदाकिनीचा वाढदिवस. एका रात्रीत स्टार होणं काय असतं हे मंदाकिनीशिवाय दुसरं कोणीच सांगू शकत नाही. पण आयुष्यात अशा काही गोष्टी घडत गेल्या की यश ज्या वेगाने मिळालं त्याच वेगाने ते निघूनही गेलं.

1985 मध्ये आलेल्या ‘राम तेरी गंगा मेली’ सिनेमातून मंदाकिनी यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आर.के. बॅनरची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे हिरो होते राज कपूर यांचा भाऊ राजीव कपूर तर अभिनेत्री होती 16 वर्षांची मेरठची मंदाकिनी.

पहिल्या दिवसापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. एका रात्रीत मंदाकिनी हे नाव देशभरात प्रसिद्ध झालं होतं. या सिनेमाने मंदाकिनीला त्या सर्व गोष्टी दिल्या, ज्याची इतर अभिनेत्रींना आयुष्यभर आस असते. या सिनेमानंतर मंदाकिनीकडे सिनेमांच्या ऑफरची रांग लागली होती.

1985 ते 1990 या पाच वर्षात मंदाकिनीने मिथुन चक्रवर्तीसोबत ‘डांस डांस’, गोविंदासोबत ‘प्यार करके देखो’ आणि अनिल कपूरसोबत ‘तेजाब’ अशा हिट सिनेमांत काम केलं. 1990 नंतर मात्र सगळी गणितं बदलली. या काळात तिचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं.

वृत्तपत्रात मंदाकिनी आणि दाऊदच्या नात्याबद्दल रकानेच्या रकाने लिहिले जाऊ लागले. जर दिवशी त्यांचे फोटो छापले जात होते. या सगळ्यात मंदाकिनीने कधीच त्यांच्यातील प्रेमसंबंध मान्य केले नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असेच ती बोलत राहिली.

पहिल्या चित्रपटातून स्टार झाल्यानंतरही मंदाकिनीला चित्रपट जगात फारसे यश मिळू शकले नाही. तिच्या कारकिर्दीत सुमारे 42 चित्रपट केल्यानंतर अचानक मंदाकिनीला चित्रपट मिळणे बंद झाले. 

मंदाकिनीने अत्यंत सोप्या पद्धतीने सात फेरे घेतले. अभिनेत्रीने 1990 मध्ये डॉ. काग्यूर टी रिन्पोचे ठाकूर यांच्याशी लग्न केले. अभिनेत्रीचा पती 70 ते 80 च्या दशकात मर्फी रेडिओच्या प्रिंट जाहिरातींमध्ये दिसला होता. अभिनेत्रीचा नवरा मुंबईत तिबेटियन हर्बल सेंटर चालवतो. तर मंदाकिनी आता योगा शिकवते. त्यांना दोन मुलेही आहेत.