टीम AM : विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखड्यात वास्तुशास्त्र अभ्यासक्रम समावेश करण्याच्या मुद्द्यावरून अधिसभेत जोरदार खडाजंगी झाली. फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या या विद्यापीठात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा अभ्यासक्रम रद्द करावा, सदस्यांची ही मागणी लक्षात घेऊन अखेर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना हा विषय बृहत आराखड्यातून वगळण्याचा निर्णय घ्यावा लागला.
सन 2024 ते 2029 या पाच वर्षांसाठी तयार करण्यात आलेला बृहत आराखडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मान्यतेस्तव बुधवारी अधिसभेच्या पटलावर ठेवला. तेव्हा मानव्य विद्याशाखेंतर्गत बृहत आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ‘वास्तुशास्त्र व न्युमेरॉलॉजी’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमास सुरुवातीलाच प्रा. सुनील मगरे, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. संजय कांबळे यांनी कडाडून विरोध केला. विद्यापीठाने औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांसाठी हा अभ्यासक्रम बृहत आराखड्यात प्रस्तावित केला होता. सदस्यांनी एकत्रितपणे या अभ्यासक्रमास कडाडून विरोध केला.
यावेळी सदस्यांनी अंधश्रद्धेला उत्तेजन देण्याचा विद्यापीठाचा हेतू आहे का ? अशा प्रकारचे अतार्किक, भंपक अभ्यासक्रम सुरू करून विद्यापीठाचा पुरोगामी चेहरा पुसण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर खपवून घेणार नाही. प्रवेशासाठी कोणती पदवी घेणारे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून हा अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला. अध्यापनासाठी प्राध्यापकांचा निकष काय लावणार, याचा सिलॅबस काय असेल, असे एक नव्हे असंख्य प्रश्न उपस्थित करून सभागृह दणाणून सोडले. तेव्हा कुलगुरू डॉ. येवले यांनी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम वगळण्याचा निर्णय घेतला.
660 नवीन अभ्यासक्रम प्रस्तावित
बृहत आराखड्यात सुमारे 660 नवीन अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आले असून यात 80 टक्के कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद 194, जालना 152, बीड 174 व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 140 अभ्यासक्रमांचा प्रस्ताव आहे. विद्यापीठाचा मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसर या ठिकाणी जवळपास 40 अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत. यामध्ये जैवतंत्रज्ञान, फॅशन डिझाईन, शैक्षणिक व्यवस्थापन, उद्योजकता विकास, रोबोटिक सायन्स, जिम ट्रेनिंग ॲण्ड हेल्थ मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस, स्पेस टेक्नॉलॉजी, पर्यटन प्रशासन आदी विषयांचा समावेश आहे.