200 सह्यांचे दिले राष्ट्रपतींना निवेदन
टीम AM : मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दिनांक 22 जूलै शनिवार रोजी शहरात अंबाजोगाईकरांच्या वतीने काळ्या रिबीन बांधून निषेध करत ‘मूक मोर्चा’ काढण्यात आला.
‘मूक मोर्चा’ ची सुरुवात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून झाली. हा’ मूक मोर्चा’ उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर अंबाजोगाईकरांच्या 200 सह्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले. या मोर्चात महिलांनी काळ्या साड्या तर पुरुषांनी काळ्या रिबीन बांधून सहभाग नोंदवला.
काय म्हटलंय महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना दिलेल्या निवेदनात….
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये महिलांवर होणारे हल्ले, अत्याचार यांनी कळस गाठलेला आहे. मणिपूर राज्यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून भीषण हिंसाचार होत आहे, यामध्ये महिलांना लक्ष्य केले जात आहे, हे दाखवणारे व्हिडीओ वृत्त माध्यमांवर आणि समाज माध्यमांवर प्रगट झाले. अत्यंत खेदजनक व संतापजनक अशी ही घटना मे महिन्यामध्ये मणिपूरमध्ये घडली. महिलांना विवस्त्र करून अत्यंत लांछनास्पद पद्धतीने त्यांच्यासोबत व्यवहार करीत त्यांची धिंड काढली गेली आणि यात अनेक बघे पुरुष व तरूण होते. हा व्हिडिओ तीन महिन्यानंतर माध्यमांपर्यंत आला, याचा अर्थ या घटनेच्या आधी आणि नंतरही मणिपूर येथे होत असलेल्या हिंसाचारामध्ये महिला क्रूर अत्याचारास बळी पडत आहेत.
मणिपूर हा आपल्या देशाचा भाग आहे आणि देशातील कोणत्याही स्त्रियांवर अशा पद्धतीने अत्याचार होत असतील तर सरकारने तातडीने कार्यवाही करायला पाहिजे. मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात शहरात आम्ही अंबाजोगाईकरांच्या वतीने काळ्या रिबीन बांधून निषेध करत ‘मूक मोर्चा’ काढण्यात आलाय. महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात आम्ही आमचा निषेध व्यक्त करीत आहोत. महिलांवर हिंसाचार करणाऱ्या व्यक्ती, कायद्याची पायमल्ली करणारे अधिकारी आणि शासन या सर्वांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करतो, असं सदरील निवेदनात म्हटले आहे. या ‘मूक मोर्चा’ त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी, महिलांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.