टीम AM : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची पाडलेली कमान शासनाच्या निधीतून बांधून देऊ. ती कमान पाडणाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.
मुंबईत मंत्रालयात शिष्टमंडळासमवेत त्यांनी चर्चा केली. बेडग येथील कमान पाडल्याच्या निषेधार्थ गावातील आंबेडकरी विचारांचे लोक लेकराबाळांसह गेल्या तीन दिवसांपासून मुंबईला चालत निघाले आहेत. त्यावर काल विधानसभेत चर्चा झाली.
त्यानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आंदोलकांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्हिडिओ कॉलव्दारे चर्चा घडवली. फडणवीस यांनी पाच जणांचे शिष्टमंडळ घेऊन चर्चेला यावे, अशी विनंती केली. समीत कदम यांनी आंदोलकांशी चर्चा करून आजची बैठक निश्चित केली.
डॉ. महेश कांबळे यांनी या विषयाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. बेडगचे सरपंच उमेश पाटील यांनी मुद्दाम हा प्रकार केला असून पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांची त्यांना फूस आहे. त्यांनी प्रशासनावर दबाव टाकून कमान पाडायला लावली, अशी तक्रार त्यांनी केली. हा संपूर्ण विषय फडणवीस यांनी समजून घेतला. जे घडले ते चुकीचे आहे, दलित समाजावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही.
पाडलेली कमान शासन पुन्हा बांधून देईल. त्याचवेळी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने यात कार्यवाही केली आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला तत्काळ तसे आदेश दिले. यावेळी आमदार विनय कोरे, पृथ्वीराज देशमुख, समित कदम, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिलीप राजूरकर, मिरजेचे उपअधीक्षक प्रणील गिल्डा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, सचिन कांबळे, उमेश धेंडे आदी उपस्थित होते.