टीम AM : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान मराठवाड्यात देखील गेल्या दोन – तीन दिवसांत अनेक भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे.
तर आता मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता असून, उर्वरित जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी बरसतील. राज्यात सर्वत्र दमदार पाऊस होत असताना मराठवाड्यात मात्र कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा..
मराठवाड्यात गेल्या तीन – चार दिवसांत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कुठे रिमझिम तर कुठे दमदार पाऊस पडतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. मात्र, असं असले तरीही मराठवाड्यातील अनेक प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. त्यामुळे आगामी काळात लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशा परिस्थितीत मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.